हिरवं कोकण - Green Konkan


गर्द हिरवी झाडी, स्वच्छ, सुंदर, अथांग समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड, किल्ले, बंदरं, मंदिरं असं पाहण्यासाठी कितीतरी ?

.

हिरवं कोकण !!

गर्द हिरवी झाडी, स्वच्छ, सुंदर, अथांग समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड, किल्ले, बंदरं, मंदिरं असं पाहण्यासाठी कितीतरी आहे कोकणात. मन हरखून टाकणार्या निसर्गाबरोबरच नाव घेतलं तरी जिभेवर चव रेंगाळते. आंबे, फणस, काजू चाखायचे असतील तर कोकणची सैर केलीच पाहिजे. कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याची लयलूट.

मे महिन्यात कोकणात जायचं. आंबे, फणस, काजू आणि चविष्ट मासे चाखण्यासाठी तरी निसर्गरम्य कोकणची सैर करायलाच हवी. निसर्गसुंदर कोकणात फेरफटका मारण्याची मजा काही औरच. निसर्गाचं भरभरून दान मिळालेल्या या मुलखात पाहण्यासाठी अनेक पर्यटनस्थळं आहेत.

गर्द हिरवी झाडी, स्वच्छ, सुंदर, अथांग समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड, किल्ले, बंदरं, मंदिरं असं पाहण्यासाठी कितीतरी आहे कोकणात. मन हरखून टाकणार्या निसर्गाबरोबरच नाव घेतलं तरी जिभेवर चव रेंगाळते.

आंबे, फणस, काजू चाखायचे असतील तर कोकणची सैर केलीच पाहिजे. बरं मुंबईसारख्या शहरातून कोकणात जायचं असेल तर प्रवास तो किती? जवळच्या रायगडात जायचं असेल तर तीन-चार तास आणि अगदी तळकोकणात जायचं म्हटलं तर दहा तास.

एकदा का कोकणात पाऊल ठेवलंत की निसर्गाचा मनमुराद आनंद लुटताना प्रवासाचा शिणवटा कुठच्या कुठे विसरून जाल.

रायगड

मुंबईपासून जवळच काही तासांत आपण रायगड जिल्ह्यातील काही अप्रतिम बिचेसवर पोहोचू शकतो. अलिबाग, मुरुड, किहिम, काशिद, दिवे आगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, उरण असे सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात.

मुंबई-गोवा मार्गानं निघायचं आणि वडखळवरून अलिबागला जायचं. अलिबागवरून पुढे मुरुड, काशिद आणि किहिम अशी स्वच्छ बिचेस आहेत. मुरुडच्या पुढे समुद्रातल्या जंजिरा किल्ल्यावर होडीनं जायचं आणि तिथलं ऐतिहासिक वैभव पाहायचं. तो अनुभव अप्रतिमच. दिवे आगर आणि श्रीवर्धन, हरिहरेश्वरला जायचं तर माणगाववरून जावं लागतं.

नारळी, पोफळीच्या बागा, समोर समुद्रकिनारा असा नयनरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद इथं घेता येतो. या बिचेसपासून शंभर दीडशे किलोमीटरवर तुम्हाला रायगड किल्ल्यावरही जाता येतं. याशिवाय समुद्रातील उंदेरी खांदेरी किल्ले, कुलाबा किल्ला हे देखील पर्यटकांना साद घालतात.

रायगडमधील पर्यटनस्थळांवर आता छोटी-मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट असल्यानं राहण्याची अडचण जाणवणार नाही. याशिवाय अनेक ठिकाणी एमटीडीसीनंही निवासाची व्यवस्था केलीय. रायगडमधील या पर्यटनस्थळावर जाण्यासाठी आणखी एक शॉर्टकट मार्ग आहे तो म्हणजे समुद्राचाच.

मुंबईतल्या गेटवेवरून लाँचमध्ये बसायचं आणि पाऊण तासाची समुद्राची सफर करून मांडवा जेटीवर पोहोचायचं. रायगडमधील या पर्यटनात अर्थातच तेथील मासे आणि अन्य चविष्ट पदार्थांवर ताव मारायला कुणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही.

रायगडातील पर्यटकांचं आणखी एक आवडतं ठिकाण म्हणजे माथेरान. नेरळवरून मिनीट्रेन पकडून किंवा टॅक्सीनं माथेरानला जाता येतं.

रत्नागिरी

समुद्र आणि निसर्गाचं रम्य वातावरण अनुभवायचं असेल तर रत्नागिरीत अनेक ठिकाणं आहेत. गुहागर, दापोली, वेळणेश्वर, मालगुंड, गणपतीपुळे, हर्णे, हेदवी असे अप्रतिम समुद्रकिनारे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. बाणकोटचा किल्ला, भगवती किल्ला, पूर्णगड, जयगड अशा गडकिल्ल्यांचा अनुभव तिथं घेता येईल. हर्णेच्या किनार्याचं सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतं. मासेमारीचं मोठं केंद्र असलेल्या हर्णे बंदरातला अनुभव पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरतो. गणपतीपुळ्याचा समुद्रही मन मोहवून टाकणारा. तिथलं गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. समुद्राचा आनंद लुटल्यानंतर निसर्गसुंदर पावसला भेट देता येईल. संगमेश्वरजवळ मार्लेश्वराचं दर्शन घेता येईल. रत्नागिरी शहरात थिबा पॅलेस पाहता येईल.
गुहागर, दापोलीला जायचं असेल तर चिपळूणपर्यंत ट्रेननं जाऊन पुढे एसटी किंवा अन्य वाहनानं जावं लागेल. मालगुंड, गणपतीपुळ्याला जाण्यासाठी रत्नागिरीला उतरून पुढे एसटीची सोय आहे.

सिंधुदुर्ग

तळकोकणात अर्थात सिंधुदुर्गात गेलात तर तिथल्या विलोभनीय निसर्गाच्या मोहात पडाल. मालवण, तारकर्लीचा सुंदर किनारा, ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, दांडीवर भरणारा मासळीबाजार, देवबाग किनार्यावरच्या लाटा सगळंच अप्रतिम. कोकण रेल्वेनं कणकवली किंवा कुडाळला उतरायचं आणि एसटी पकडून किंवा अन्य वाहनानं समुद्राची वाट धरायची. आंबे, फणस, काजू, नारळी, पोफळीची गर्द झाडी.

रस्त्याच्या दुतर्फा असलेली चिरेबंदी, कौलारू टुमदार घरं…. मनात निसर्ग रुंजी घालत असताना तीस-चाळीस किमीचा प्रवास कधीच संपतो आणि तुम्ही मालवणला पोहोचता देखील. मालवणच्या किनार्यावर मनमुराद आनंद तुम्ही लुटू शकता. होडीनं शिवाजी महाराजांनी बांधलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायलाच हवं. मालवणपासून सात किमी दूर असलेला तारकर्लीचा किनारा अप्रतिम. या किनार्यावरची रुपेरी वाळू, स्वच्छ-शांत समुद्र अशा निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही तुम्हालाच विसरून जाल. तारकर्ली पर्यटन स्थळ म्हणून चांगलंच विकसित झालं आहे. एमटीडीसीनं केलेल्या निवासाची व्यवस्था तर आहेच, पण आता घराघरातही राहण्याची सोय आहे. वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर हाऊसबोटीत मुक्काम करू शकता. स्नॉर्कलिंगचा अनुभव घेत समुद्रात मासे अगदी जवळून पाहू शकता. जवळच देवबागलाही छान किनारा आहे. याशिवाय वेंगुर्ला, भोगवे, निवती, देवगडजवळ कुणकेश्वर, विजयदुर्ग अशी अनेक ठिकाणं आहेत की निसर्गाचा मनमुराद आनंद तुम्ही लुटू शकाल. कुणकेश्वरचं समुद्राला लागून असलेलं शिवमंदिर, मराठा आरमाराचं केंद्र असलेला विजयदुर्ग अशी कितीतरी ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. मालवणहून कुडाळकडे येताना धामापूरचा निसर्ग तुम्हाला खुणावतो. याशिवाय वैभववाडीजवळचा बारमाही वाहणारा नापणेचा धबधबा आणि कोणत्याही दिवसात धुक्याची चादर पाहायची असेल तर? अर्थातच आंबोलीला जावं लागेल.

परतताना सुंदरवाडीत अर्थात सावंतवाडीत फेरफटका मारता येतो. राजवाडा, नरेंद्र डोंगर, मोतीतलाव असं सौंदर्य न्याहाळताना चितार आळीतून लाकडी खेळणी खरेदी करता येतात. शिल्पग्राममधून हस्तकौशल्याच्या वस्तू घेता येतील. सिंधुदुर्गातील निसर्गाचं मनोहारी दर्शन घेतल्यानंतर रामगड, भरतगड, भगवंतगड असे गडकिल्लेही पाहता येतील. कणकवलीत गोपुरी आश्रम, भालचंद्र महाराजांचा मठ अशा ठिकाणी जाऊन मनःशांती मिळवता येईल. सिंधुदुर्गातून पर्यटनाचा आनंद घेऊन परतताना मनात तुमचं मन तिथल्या निसर्गासारखं ताजंतवानं असेलच आणि जिभेवर खास मालवणी पदार्थांची चवही तशीच रेंगाळत रहावी असं नक्की वाटते ..

..... प्रशांत चौगुले .....

https://www.facebook.com/prashant.chougule.121

Comments