किल्ले वासोटा.. एक स्वप्नपूर्ती


सह्याद्री च्या कुशीत दडलेल्या अनेक दुर्गम रत्नांपैकी एक रत्न. दुर्गात दुर्ग उत्तम असा वनदुर्ग म्हणजे किल्ला

.

किल्ले वासोटा.. एक स्वप्नपूर्ती

सह्याद्री च्या कुशीत दडलेल्या अनेक दुर्गम रत्नांपैकी एक रत्न. दुर्गात दुर्ग उत्तम असा वनदुर्ग म्हणजे किल्ला वासोटा .संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत वासोटा म्हणजे आश्रयदाता .छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात कैद्यांना शिक्षा म्हणून किल्ले वासोटा चा वापर केला जायचा. अफजल खान स्वारीच्या वेळी शिवरायांना मदत नाकारणाऱ्या इंग्रज अधिकारी रेव्हिग्टन व इतर इंग्रज अधिकाऱ्यांना याच किल्ल्यावर ठेवले होते .

सह्याद्रीच्या कुशीत आणि कोयनेच्या मुशीत दडलेला वासोटा वनदुर्ग या प्रकारात मोडतो .समुद्रसपाटीपासून सुमारे 4267 फूट उंची असणारा हा वनदुर्ग व्याघ्रगड या नावाने ही ओळखला जातो. जावळीच्या जंगलामधील त्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असलेले हे अनोखे दुर्गरत्न शिलाहार वंशीय दुसरा राजा भोज यांनी बांधून काढले .छत्रपती शिवरायांनी हा किल्ला 6 जून 1960 रोजी जिंकून स्वराज्यात आणला.

सातारा ते बामणोली 35 किलोमीटरचे अंतर. बामनोली पासून वन विभागाची परवानगी घेऊन बोटीने वासोट्याला जावे लागते. सोबत दुपारची न्याहारी नेणे गरजेचे आहे . कोयने वर बांधलेला 'शिवसागर'जलाशय ओलांडून वासोट्याला जावे लागते .शिवसागर जलाशय आणि सह्याद्री वरील घनदाट अरण्य यामुळे वासोट्याची दुर्गमता अधिकच वाढते.

बामनोली ते वासोटा बोटीचा प्रवास जवळपास दीड तासांचा. कोयनेचा विस्तीर्ण जलाशय मन मोहून टाकतो .घनदाट अरण्य आणि त्यात लांबवर पसरलेले कोयनेचे पात्र डोळ्यांचे पारणे फेडते .

शिवसागर जलाशयाचे पाणी वासोट्याच्या पायथ्याला स्पर्श करते .येथे वनाधिकारी आपल्या बॅगची तपासणी करतात आणि प्लास्टिकच्या वस्तूंवर वर डिपॉझिट आकारतात. येथून पुढे वासोट्यावर चढायला सुरुवात होते . अथांग पाण्याने वेढल्यामुळेच वासोटा किल्ल्या भोवतालचे मूल्य जंगल संपत्ती व वन्य जीवन सुरक्षित राहिले आहे .याची पदोपदी जाणीव होते.

घनदाट जंगल , आकाशाशी स्पर्धा करणारी झाडी,वाहता झरा जमिनीत मिसळणारा नाकतोडा, झाडाच्या खोडावर लपलेला पतंग, काडीच्या रंगाची आळी आणि झाडाच्या खोडावर लपलेली आळी असे एक ना अनेक असंख्य जीव निसर्गाची नानाविध रूपे आपल्याला येथे पाहायला मिळतात. मध्येच वाटेत लागणाऱ्या झऱ्याचे पाणी पिऊन,मन अगदी तृप्त होते.

वासोटा चढताना एक वेगळीच गंमत अनुभवता येते ती म्हणजे शरीराची आणि मनाची होणारी एकरूपता .शरीर आणि मन कधी एकरूप होऊन जाते हे कळतसुद्धा नाही. अर्ध्यावर चढण झाली की समोर दिसणाऱ्या दृश्‍याने डोळ्यांचे पारणे फेडले जाते .प्रचंड हिरवीगार झाडी ,दोन डोंगरांमधील उंचावरून दिसणारा जलाशय पाहून आलेला थकवा कुठल्या कुठे पळून जातो व दहा हत्तींचे बळ देऊन किल्ला चढायला प्रवृत्त करतो. किल्ल्यावर दरवाजाने प्रवेश केल्यावर समोरच बिना छपराचे मारुतीचे मंदिर नजरेत येते.

मारुती मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणारी वाट किल्ल्याच्या भग्नावशेषांकडे घेऊन जाते .उजवीकडून जाणारी वाट महादेवाच्या मंदीरापासून पुढे माचीवर जाते. मंदिरात चार ते पाच जणांची राहण्याची सोय होऊ शकते .महादेवाचे मंदिर तसे प्राचीन पण सुबक मनाला नक्कीच प्रसन्न करते . माची वरून दिसणारे निसर्गाचे विलोभनीय दृश्य थक्क करते. घनदाट झाडांनी व्यापलेला प्रदेश कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा रमणीय आहे.

मारुतीच्या देवळाच्या डावीकडे जाणारी वाट बाबुकडा कडे घेऊन जाते .वाटेत जोड टाक्या लागतात. बाबू कड्यावरून समोर भव्यदिव्य असा जुना वासोटा दिसतो .जंगली श्वापदांचा वावर असल्याने तिकडे सहसा कोणी फिरकत नाही. बाबुकडा वरून प्रतिध्वनी ऐकायला वेगळीच मजा येते .

शरीर व मन यांची पूर्तता करणारा डोळ्यांना अच्युतम सुखाची अनुभूती देणाऱ्या वासोट्याची आठवणी उराशी बाळगून व एका स्वप्नपूर्तीचे समाधान सोबत घेऊन आमचा परतीचा प्रवास सुरू होतो

Source Facebook

https://www.facebook.com/groups/1831343440292115/permalink/3424519597641150/?__tn__=K-R

Comments